श्री सिद्धेश्वर महाराज हे करवीरच्या छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) यांचे आध्यत्मिक गुरु होते. करवीरचे छत्रपती शिवाजी महाराज हे शककर्त्या शिवाजी महाराजांच्या व्दितीय पूत्र राजाराम महाराज व करवीर संस्थानाच्या संस्थापीका ताराराणी यांचे नातू होतं.


श्री सिद्धेश्वर महाराजांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीस म्हणजे रामनवमी शके 1655 या पवित्र दिवशी (दुपारी) मध्यानसमयी झाला. त्यांचे जन्मगाव वेरूळनजीकच्या बाबरे हे असून त्यांच्या वडिलांचे नाव "राम" व आईचे नाव "गोदावरी" असे असून आडनावं "देव" असे होते.


वडील पूत्र कर्तासवरता झाल्यानंतर श्री सिद्धेश्वर महाराजांच्या आईवडिलांनी आपले गाव सोडून श्री हरिहरेश्वर येथे कालभैरवाची उपासना करण्यासाठी प्रस्थान केले. बारावर्षे कालभैरवाची उपासना केल्यानंतर श्री कालभैरवाने प्रसन्न होऊन स्वप्नात येऊन "मी तुमचे पोटी जन्म घेईन व माझे नाव सिद्धेश्वर असे ठेवावे" असा दृष्टांत दिला. त्यानंतर पुनःश्च आपल्या गावाकडे येताच सौ. गोदावरी यांना दिवस जाऊन रामनवमीस पुत्रप्राप्ती झाली. लहानपणापासूनच सिद्धेश्वराची वर्तणूक अत्यंत पवित्र व शुद्ध असून अंतर्मुख असे. त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी उपनयन व लग्न असे दोन्हीही संस्कार करण्यात आले. मात्यापित्याविषयी अत्यंत आदरयुक्त वर्तन असून भौतिक गोष्टींविषयी उदासीनता हे सिद्धेश्वराच्या वर्तनाची विशेषता होती. वृत्ती आत्मध्यानी असून रामाविषयी अतिशय प्रेम व भक्ती होती. उदरनिर्वाह करीता पारंपारिक व्यवसाय करावा असे वडिलांनी सुचवताच "मी फक्त रामासच यजमान मानतो अन्य कोणाकडेही मी याचना करणार नाही" असे उत्तर श्री सिध्देश्वराने दिले. त्याने औरंगाबाद येथील प्रसिद्ध संतकवी श्री अमृतराय यांचेकडून गुरुपदेश घेतला. त्यासुमारास त्यांच्या प्रथम पत्नीचे निधन झाले व त्याच वर्षी त्यांचा पुनर्विवाहही झाला. वडिलांच्या निधनानंतर ते एक वर्ष आपल्या गावीच राहिले.

परंतु आत्मानुभूतीकरता संसारादि उपाधींचा त्याग करून आपल्या गुरूंच्या सांगण्यावरून त्यांनी बनारस येथील श्री अद्वैतानंद यांचेकडे प्रस्थान केले. श्री अमृतराय यांनी श्री सिद्धेश्वरास जी गुरु परंपरा सांगितली ती अशी -

आदिनारायण -> ब्रम्हदेव -> सनक -> नारद -> व्यास -> शुक -> पूर्णानंद -> अद्वैतानंद -> अमृतराय

बनारस येथे श्री अद्वैतानंद यांचेकडे जाताच त्यांनी पठणास सुरुवात केली असता "मला पुस्तकी विद्या नको अनुभुती हवी" असे सांगताच पोथ्या पुस्तके बाजूला ठेऊन ध्यानधारणेचा अभ्यास करावयास अद्वैतानंदानी सांगितले व त्याप्रमाणे अभ्यास केला असता केवळ पंधरवड्यातच श्री सिद्धेश्वरास आत्मानुभूती येऊन चित्कला प्राप्त झाली. हि स्थिती दृढ करणेसाठी अधिक काळ तपश्चर्या करण्याच्या उद्दिष्टाने त्यांनी कृष्णा नदी शेजारी कोळे नरसिंहपूर तालुका कऱ्हाड हे पवित्र व शांत ठिकाण निवडले .

दररोज ब्राहमुहूर्तावर उठून कृष्णेत स्नान करत ध्यानधारणा करणे , तसेच तेथील श्री नृसिंहाचे मंदिरातील भुयारात ध्यान करणे इत्यादी तपस्या आठ वर्षे केली . या काळात वर्तनाने पवित्र व शुध्द् असणाऱ्या ब्राम्हणाचे घरी लाह्याच्या पिठाची भिक्षा एकदाच मागून आठ दिवस त्यावरच गुजराण केली.

या काळात अनेक चमत्कार घडले . ते समाधिस्थ असता शेजारी वीज पडूनही त्यांची समाधी भंग न पावत त्यास काही इजा न होणे , ध्यान करण्यासाठी सुसरीपाठी आसन करणे , मृतांना संजीवन देणे , शरणागतांचे अनेक दुर्धर आजार बरे करणे इत्यादी. परंतु यामुळे अनेक भक्तांची तेथे वर्दळ जास्त होऊन त्यास ध्यानधारणेत व्यत्यय येऊ लागल्याने जवळीलच जंगलातील पशुपती नामक विख्यात मंदिरात एक वर्ष त्यांनी तपस्या केली .

त्यानंतर आपल्या आईस व नातेवाईकास बारा वर्ष्यातील आज्ञातवासानंतर भेटणे आवश्यक असल्याने त्यांनी बाबऱ्यास प्रस्थान केले . प्रथम औरंगाबादेस जाऊन त्यांनी आपल्या गुरूंची म्हणजे अमृतरायांची भेट घेतली व त्या नंतर ते बाबऱ्यास गेले . परंतु त्यांच्या आईची व त्यांची भेट झाली नाही कारण त्यांची आई त्यांचा शोध घेत सर्वत्र फिरत होत्या. आपली आई करवीरात आहे हे समजल्यानंतर त्यांनी आईस आणण्याची व्यवस्था करून आईची भेट घेतली . त्यानंतर पत्नी भवानीबाई व सर्व कुटुंबासह नरसिंहपुरास प्रयाण केले .

तेथील वास्तव्यात अनेक चमत्कार घडल्याने त्यांची ख्याती सर्वदूर पसरली . संसारातील त्रिविध तापाने पोळलेले अनेक भक्तजन आपल्या समस्या निवारणाकरिता श्रींचे चरणी येऊ लागले . लोक मोठ्या भक्तीने व प्रेमाने त्यांना "सद्गुरू व बावा" अशा नावाने ओळखत . त्यांच्या कृपेचा अनेकांना लाभ होऊन क्षय , अपस्मार ,जलोदर इत्यादी व्याधी दूर झाल्या . भूतबाधा , संमंधबाधा दूर झाल्या इतकेच नव्हे तर अनेकांचे अपमृत्यूही त्यांच्या वरदानाने टळले.

श्री सिद्धेश्वर महाराजांना तीन पुत्ररत्ने व दोन कन्यारत्ने प्राप्त झाली . त्यापैकी प्रथम पुत्र श्री रामचंद्र पंडित उर्फ बाबा महाराज (चैत्र वंद्य नवमी शके 1691 ते अक्षय तृतीया शके 1750) हे अत्यंत प्रकांड पंडित असून प्रस्थानत्रयीवर त्यांच्या टीका प्रसिद्ध आहेत तसेच त्यांची काशी येथे व्यासपूजा झाली होती . द्वितीय पुत्र श्री नारायण उर्फ नाना महाराज हे मोठे पंडित असून शीघ्रकवी व विठ्ठल भक्त होते . बडोद्याचे सयाजी महाराजांचे गुरु श्री रघुपती महाराज हे त्यांचे शिष्यवर होते. तृतीय पुत्र श्री वासुदेव उर्फ भाऊ महाराज हे प्रख्यात राजकारणी असून पेशव्यांच्या दरबारी करवीरच्या छत्रपतींनी त्यांची वकील म्हणून नेमणूक केली होती . कन्यारत्नामध्ये ज्येष्ठ कन्या ताई महाराज या विशाळगडकर पंतप्रतिनिधी यांच्या स्नुषा असून मोठ्या संतपदाला पोहचल्या होत्या . कोल्हापूर जिल्ह्यातील सरूड कापशी येथे त्यांचे समाधीस्थान असून ते जागृतपणाकरता आसपासच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे .

तसेच द्वितीय कन्या कृष्णाबाई याही कडेगाव , सांगली येथील देशपांडे नामक इनामदार कुटुंबाच्या स्नुषा असून अध्यात्मिक क्षेत्रात त्यांचा अधिकार फार मोठा होता .